किस्सा रविवार दुपारच्या मॅच चा


‘ए, तुझ्या कडे किती पैसे आहेत ?’ चेतनने विचारले.

मी पण लगेच उत्तर दिले, ‘५ रुपये, का picture ला जायचा आहे का?

‘अरे, मोठा हो, लहान आहेस का picture बघायला?’

हाच काल म्हंटला होता, picture ला जाऊ, बरेच दिवस झाले theater ला गेलो नाही, जरा लक्ष्मीनारायण ला जाऊ….. आता एका दिवसात हा लहानाचा मोठा होईल, मला कसे कळणार !

पण कसे आहे मित्रांचे स्वभाव एक मेकांना चांगलेच ठाऊक असतात, हा अशी उलट सुलट उत्तर देतोय म्हणजे याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतय….. याच्या नादी लागुन आपला रविवार वाया जाणार याची भनक मला लागली, तो वाचवण्या साठी मी पटकन बोललो, ‘अरे, सायकल मध्ये हवा भरून oiling करायची आहे…..’

पण ऐकेल तो चेतन कसा, ‘माझ्या कडे pump आहे, आणि oil चा मोठा डब्बा आहे, आपण घरी करू सायकल चे काम’

लेगच तो अनुज कडे वळाला, ‘ए ढोल, तुझ्या कडे किती आहेत’

‘माझ्या कडे पण ५ आहेत, पण मला pen घ्याचा आहे, एक pen-pencil पण …..’ त्याचे बोलणे तोडत चेतन लगेच बोलला, ‘माझ्या कडे एक extra आहे, देतो मी तुला’

अनुज चे तोंड बारीक झाले, चेतन ने बॉल पडण्या आधीच six मारला, थोडी सहानभूती भेटावी म्हणून त्याने माझ्या कडे बघितले, पण मी “गेला रविवार” हे accept करून, खिशातले पैसे बाहेर काढलेले होते.

प्रश्न पैसांचा न्हवता, चेतन च्या idea म्हणजे विकत चे दुखणे, एकदा असाच रविवार होता, एप्रिल महिना, कडक ऊन, तापलेली गच्ची, मस्त पैकी आम्ही टाकी च्या सावली मध्ये पत्ते खेळत बसलो होतो. भाऊ नी अशीच contri काढली आणि plan केला, “मी तुम्हाला एकदम first class ice-cream खायला घालतो”. आता एप्रिल महिना, त्यात तो पुण्यातला एप्रिल महिना, कडक ऊन, कोरडं वारं, आणि त्यात पुणेकर.

पुणेकर आणि पुणे दुपारी १ ते ४ झोपते, उन्हाळ्यात दोन्ही कडे एक एक तास add होतो आणि पुणे १२ ते ५ झोपते. दुपारी एक ला तुम्ही जर स.प.महाविद्यालया च्या समोर उभे असाल, तर, एकीकडे साहित्य परिषद आणि दुसरी कडे हिराबाग, रस्त्या वर एक कुत्र पण दिसणार नाही. टिळक रोड वर जे कोणी जागे आहेत, न झोपलेली मंडळी आहेत, ते सगळे तुमच्या बरोबर स.प. च्या झाडांच्या सावलीत असतील,- “ऊन उतरायची वाट बघत”.

अश्या  १ च्या उन्हात, चेतनने आम्हाला बिबवेवाडी ते जंगली महाराज रोड, सायकल वर न्हेले, “snowball” ची ice-cream एक नंबर असे म्हणत. जेव्हा स.प. cross केले, सगळी मंडळी आमच्या कडे अशी एकटक बघत होती…..”वेड्यांची गॅंग”, “पुण्याबाहेरचे”, हे शब्द त्यांच्या डोळ्यातूनच आमच्या पर्यंत पोचले!

तब्बल ९ किलोमीटर सायकल मारत, त्या तापत्या उन्हात snowball ला पोचलो…..

shutter वर, वाकड्या अक्षरांमध्ये, लाल paint ने लिहिले होते, “दुकान १२ ते ५ बंद राहील” !!. पुढचे दोन दिवस, आमच्या सगळ्यांचा चेहरा टमाट्या सारखा लाल आणि टमाट्या सारखाच सुजला होता…..

 

dukaan band rahil
Snowball, Jungli Maharaj road, Pune

प्लॅन काय आहे?

मी घाबरत घाबरत पैसे चेतन कडे दिले, अनुज चा पण नाईलाज होता, चेतन ने यवस्तीत मोजले, १० रुपये जमा….. मग तो आमच्यातल्या सम्या कडे वळला,

सम्या आमच्यातला सर्वात शांत, खुप कमी बोलणारा, पण तेवढाच sharp, आणि त्याचे बोलणे पण तेवढेच sharp. गेल्या जन्मी सम्या हा हिमालयात monk होता असे चेतन चे म्हणणे होते, पण हिमालयातले monk खुप soft spoken असतात, आणि सम्या जरा….. तीक्ष्ण बोलतो, म्हणून त्याला monk पदावरून हाकलून दिले आहे, असा अंदाज होता

चेतन काही बोलण्या आधी सम्याच बोलला, ‘का रे चेतन, तुझ्या दुकानी….. घरी extra नोटबुक आहे का रे?’

चेतन थोडा बिचकला, वेळ सांभाळून न्हेण्या साठी एक smile दिली, आणि उगाच डोक्या वरचे केस इकडं चे तिकडे केले आणि परत तिकडचे इकडे केले…

सम्या ने खिश्यातुन ५ रुपये काढले, चेतन च्या हातात ठेवले, आणि थेट मर्मावर बोट टाकले, ‘बोल आता plan काय आहे?’

आमच्या मनातला प्रश्न सम्या ने विचारला होता, मी आणि अनुज कान देऊन ऐकू लागलो, आता काय विचीत्र plan आहे याचा

चेतन ने हातातले १५ रुपये मोजले, स्वतःच्या खिश्यातुन १० रुपयांची एक नोट, आणि ५ रुपयांची एकदम कोरी करकरीत हिरवी नोट जोडली, ‘हे झाले आपल्या कडे ३० रुपये, आता आपण मॅच घेउयात’

‘कसली?’ आम्ही तिघे एका स्वरात आश्चर्याने literally ओरडलो

‘क्रिकेट ची…..’ असे चेतन एकदम सहज पणे बोलला…..

 

सायकल : एक कि दोन capacity
सायकल : एक कि दोन capacity

प्लेयिंग ११ ? ! ?

‘अरे चेतन, cricket ची कसली मॅच खेळतोस, आपण एक तर प्लास्टिक बॉल half pitch खेळणारे, कुठे मॅच खेळतो रे बाबा’ अनुज चालू झाला.

पण शंका कुशंका काढणे अनुज ची सवय होती, आणि त्याची इतकी सवय झाली होती, कि कोणी त्याच्या शंकांचे निरसन पण करायला जायचा नाही, चेतन नि शांत पणे सायकल स्टॅन्ड वरून काढली आणि तो निघाला.

मला एकच आनंद होता कि कुठे लांब नाही जायचे, मी पण सायकल काढली आणि निघालो, सम्या तसे ही काही बोलत नाही, त्यामुळे तो पण शांत पणे निघाला.

अनुज ला थोड्या वेळात कळाले कि तो एकटाच बडबड करत आहे, कुठे वाद घाला, असे करत तो पण निघाला

तिघे रोड ला लागलो आणि तितक्यात तन्मय दिसला, तो चालत चालत आमच्या कडेच येत होता.

चेतन लगेच त्याला बोलला, ‘तन्मय चल, बस carrier वर’

आता ही  तन्मय चेतन जोडी पण एक अजबच जोडी होती, contrast ज्याला म्हणतात अशी, चेतन मध्ये जितके किडे होते, तितकाच तन्मय शांत स्वभावाचा, चेतन कसा बसा चार- साडेचार फूट तर तन्मय आरामात पाच, आकार मानाने बघायला गेले तर चेतन तन्मय च्या exact अर्धा….. आणि तरी या अजब जोडी ची एक खासियत होती, ते दोघे एकाच सायकल वर फिरायचे, आणि journey ची नेहमी सुरवात याने ह्याची-  ‘तन्मय चल, बस carrier वर’

शरीराने डबल असलेला तन्मय निमूटपणाने carrier वर बसायचा. चेतन  पेडल मारायला चालू करायचा, आणि  उतार असेल तर ५ मीटर, फ्लॅट रोड असेल तर ३ मीटर आणि चढ असेल तर १ मीटर….. सायकल थांबवायची, आणि पुढचा मागे आणि मागचा पुढे, वर म्हणजे हा सर्व खेळ दोघे पण एक हि शब्द ना बोलता पार पडायचे.

दोघांचे communication wireless आहे, असे आम्ही म्हणायचो.

या वेळी पण तेच झाले.

त्यांचा हा खेळ होई पर्यंत आम्ही कडे ला उभे राहिलो,

अनुज पुन्हा चालू झाला, ‘अरे सम्या, त्याला सांग कुठे मॅच …..’, त्याचे बोलणे पुर्ण होण्या आधी सम्या, ‘अरे अनुज, तुझ्या सायकल मध्ये हवा कमी वाटतीये’ , अनुज उतरून बघू लागला नक्की काय, तितक्यात सम्या पेडल मारत पुढे गेला (याला टाळणे असे म्हणतात)

तो पर्यंत चेतन तन्मय चा खेळ संपला होता, ‘अरे चला’ असे instruction देऊन चेतन निघाला

पुढे जाऊन डावीकडे पार्टी वळली, तिथे ग्रुप चे हेमंत भेटले, ते त्यांच्या सायकल बरोबर होते….. बरोबर म्हणजे ते आपल्या पायांवर चालत होते, आणि एका  हाता मध्ये सायकल चे सीट ढकलत पुढे पुढे सरकत होते,…. मधेच सायकल चे हॅन्डल फिरले कि सायकल वाकडी तिकडी जायची,… हेमंत थांबून हॅन्डल सरळ करायचा आणि परत सीट ढकलणे चालू
एखाद्या सायकलस्वार ला सायकल ढकलताना बघून जी शंका कुठल्या हि नॉर्मल व्यक्ती ला येईल ती मला आली , ‘का रे, सायकल puncture आहे का?’
हेमंत- ‘नाही रे, ते काय आहे मी चेतन ला बोललो होतो कि पंधरा मिनटात पोचेल, पण जर मी सायकल वर आलो असतो तर पाच मिनिटातच पोचलो असतो, म्हणून मग चालत चालत निघालो, पंधरा मिनटात पोचू या हिशोबाने’

उत्तर ऐकून अनुज ची जीभ आपो आप बाहेर अली, मी पण डोळे एक्दम बारीक करून वर खाली मान फिरवली…..

चेतन तितक्यात आला, म्हणजे तो carrier वर आला, ‘ए हेम्या चाल लवकर’ एवढेच बोलला आणि पुढे गेला, त्याच्या सारथी ला त्याने थांब वगैरे सांगितले नाही, त्या मुळे ते तसेच पुढे गेले….
आम्ही पण निघालो, हेम्या ने विचारले, ‘अरे पण कुठे?’, पण मी आणि अनुज अजून त्याच्या त्या उत्तराच्या hangover मध्ये होतो

पुढे अवघ्या १०० मीटर वर प्रितेश चे घर होते, तिथे तो बिल्डिंग खाली उभा होता, त्याचा कोणतरी नातेवाईक आला होता, त्याच्या बरोबर गप्पा टप्पा चालू होते. तिथेच शेजारी दोन लहान कार्टी क्रिकेट खेळत होती.

Wireless communication on झाले आणि तन्मय आपोआप प्रितेश समोर जाऊन थांबला

मागून carrier वरून आवाज आला, ‘ए प्रितेश चल’ , लगेच तो त्या दोन कार्ट्यांकडे कडे वळला ,’ए चिंटू, तुला cricket ची मॅच खेळायची आहे का, चला…’

आता हेमंत ची tube पेटली, ‘अरे कुठे मॅच, कोणाशी आहे मॅच, कधी घेतली, कोणी ठरवली?’, नेमका त्या वेळी ब्रेक मारून अनुज त्याच्या जवळ येऊन थांबला , आणि सगळ्या शंका अनुज वर पडल्या, ‘अरे, ते,. काय , ते , चेतन…..’,

मी मग अनुज ला rescue करण्यासाठी बोललो , ‘सम्या ला विचार’ ….. आता हेमंत काय सम्या ला विचारात नाही, आणि विचारले तर सम्या काय त्याला नीट उत्तर देत नाही, हे आम्हाला माहिती होते, त्या मुळे प्रश्न तिथेच संपले…..

तन्मय ला पण सगळा प्रकार बहुतेक अत्ताच काळाला असावा, जर आधीच काळाला असेल तर मग तो एक चमत्कारच, anyways त्याने लगेच एका कार्ट्याला ला ऑर्डर दिली, ‘ए जा रे, प्रितेश च्या घरी जाऊन बॅट घेऊन ये, आणि एक टोपी पण आन’, हे सगळं त्याने प्रितेश ला न विचारता सांगितलं, आणि प्रितेश ला पण काही वेगेळे झाले असे वाटले नाही, त्याचा नातेवाईक मात्र थोडा चक्रावला, हा कोण आहे जो डायरेक्ट घरी जाऊन हे घेऊन ये ते घेऊन ये करणारा, पण नातेवाईक लांब चा असावा कारण त्याने हा त्याच्या चेहऱ्या वरचा प्रश्न काही ओठांवर आणला नाही आणि तो गप्पच बसला

राहिलेल्या कार्ट् तिथेच होतं, त्या मुळे वेळ घालवण्या साठी त्याचा interview चालू झाला, ‘अरे, काय जमता तुला?’

‘काय जमता तुला?’

‘मी फास्ट बॉलर आहे… श्रीनाथ सारखा’,

ते पोरगं साधारण ४-५ वी च होतं, उंची साडेतीन फुट, वजन ३० किलो, आता याने फास्ट बॉलिंग केली तर दोन टप्पे खात बॉल batsman कडे पोचेल.. पण गरज आमची होती ११ ची टीम बनवायला जरा जास्त नाही ४ जण शॉर्ट होती, त्या मुळे जास्त फाटे न फोडता, ‘ये चल’ म्हणून मोकळे झालो. दुसऱ्या चिंटू ला विचारले पण नाही, आणि त्या नातेवाईकाला पण तसेच घेतले.

पण तरी एक जण शॉर्ट पडत आहे, हा doubt अनुज ला आला पण नेहमी प्रमाणे तो ignore पण झाला

इडन गार्डन नंतर हेच ते ground

जिथे क्रिकेट खेळता येते ते ग्राउंड असते
जिथे क्रिकेट खेळता येते ते ग्राउंड असते

अशी ओबडधोबड टोळी घेऊन आम्ही एकदाचे टेकडी वर च्या ground वर पोचलो.

Ground म्हणजे शिवाजी मैदान वगेरे imagine करू नका, पुण्यात ground म्हणजे जिथे क्रिकेट खेळतात, आणि जिथे एक टप्पा आऊट नसते, ते ground. मग त्या ground वर मोठ मोठे दगड, फुटलेल्या काचा, मधेच एखादा खड्डा, त्याच्या जवळच भर उन्हाळ्यात चिख्खल असलेला खड्डा, काहीही असो, ते ground च आहे. अश्या वर खाली profile असलेल्या जागेत, त्यातल्या त्यात सपाट पट्टी शोधायची आणि दगड ठेऊन, हो जा शुरु…..

ground वरती काही पोरं खेळत होती,, आम्ही तिथे गेलो, आणि चेतन ने negotiation चालू केले, ‘आम्हला मॅच खेळायची आहे, कोणची टीम आहे का’

‘आहे की’, एक काळा टी-शर्ट घातलेला, साधारण ६ फुट उंची (आमच्या पेक्षा १ फुट जास्त !) , सडपातळ बांधा…. पुढे आला

‘मी आहे कॅप्टन, आमच्या फायटर टीम चा, तुमचा कॅप्टन कोण आहे’

‘तसा आम्हाला कॅप्टन नाही’, हेमंत पचकला, वायफळ प्रश्न आणि नको त्या वेळी जोरात मत टाकणे, हा आमच्या शंकाकारी चा गुणधर्म..

‘मी आहे’, सम्या ने वेळ सांभाळत न्हेली, ‘किती ची मॅच घ्याची’

‘५०’

५० ऐकुन जरा हवा गेली, पण चेतन पुढे सरसावला, ‘नको ३० ची घेऊ, पुढची ५० ची करू’

पुढची!, ऐकून अनुज आणि हेमंत एक मेकांकडे बघू लागले . पण कोण काही बोलण्याच्या आधी ६ फुट सडपातळ बांधा बोलला, ‘ठीक आहे, ७ ओव्हर ची मॅच ठेऊ’

‘ए चला, अव्या, रव्या, पिंट्या, चिघळ्या, पाऱ्या…. चला ७ ओव्हर ची मॅच’, असे rhyme होणारे नावं घेऊन तो त्याची टीम जमवु लागला…

तितक्यात चेतन पुढे गेला, ‘अरे आमच्या कडे एक player कमी आहे, तुमच्यातला एक extra आहे का?’

सम्या आमच्या दोघांकडे बघून हळूच हसत बोलला, ‘extra, आमचे extra सगळं घरी राहिलं’ ….. आमचा inside joke कोणाला काळाला नाही,

पण तन्मय आणि प्रितेश ला काही घेणे देणे न्हवते, एक टोपी जी प्रितेश च्या घरून अली होती तिचे काय करायचे, ती अतिथी देवो भव करत ते ती टोपी नातेवाईकाला द्याची कि आपल्यातला कोणाला द्याची….. ते दोघे त्या extra च्या track वर होते.

चेतन परतला, त्याच्या बरोबर एक इसम आला, फायटर टीम मधला तो एकमेव ४ फुटी player होता, तो त्यांनी आम्हाला gift केला, ‘हा, अश्विन’ अशी चेतन नी ओळख करून दिली.

‘काय करतो तु?’

‘फास्ट बॉलर आहे मी’

‘श्रीनाथ सारखा का?’ सम्या तिथे पण चालू झाला…

टॉस, हेड काय टेल्स काय?

एक रुपयाचा कॉइन
टॉस, हेड – टेल्स?

चेतन हेमंत कडे वळाला, ‘जा रे हेम्या, toss करून ये’

हेमंत आणि ६ फुट toss ला गेले, ‘छापा कि काटा’

‘हे बघ, मला छापा काटा कळत नाही’ हेमंत बोलला, ‘आपण, नंबर कि तीन हत्ती करायचा का?’

‘ते हत्ती नाहीयेत, सिंह आहेत’, ६ फुट ची उंची बरोबर G.K पण चांगले होते.. त्याने toss केला, हेमंत, ‘number’ असे ओरडला..

आणि number पडला,

‘काय करणार बॅटिंग का बॉलिंग?’

या प्रश्नाला हेमंत गडबडला, toss जिंकला तर काय, हे discussion च केले नाही,

आम्ही सगळे तो पर्यंत ग्राउंड च्या कडेला एक झाड होते, त्याच्या आडोश्याला सायकल लावायला गेलो होतो

आता कोणाला विचारणार हा प्रश्न हेमंत ला पडला, विचार करत  करत तो ६ फुट कडे वळाला, ‘तुम्ही toss जिंकला असता तर काय करणार होता?’

६ फुट ला हा मॅच च्या आधी चा bouncer झेपला नाही, ‘बॅटिंग’ असे तो एकदम काही कळण्या आधी, विचार ना करता बोलून गेला.

‘ठीक आहे, आमची बॅटिंग पहिली’, हेम्या बोलला

सहा फुट सडपातळ बांधा, कोणी तरी बिन पाण्याची दाढी करून गेल्यावर जे expression असतात, ते घेऊन तिथेच उभा राहिला, त्याला काहीच झेपले न्हवते, हेमंत तो पर्यंत आमच्या कडे धावत आला, ‘आपली बॅटिंग’, असे declare केले.

सगळी मंडळी लगेच झाडाच्या आसपास बसायला दगड शोधू लागली, सावलीत pavilion!, बॅटिंग आहे तर दोन कोण तरी जातील बॅटिंग ला, प्रितेश, तन्मय आणि नातेवाईक, तिघांना बॅटिंग ची अपेक्षा न्हवती, plus त्यांचा टोपीचा प्रश्न अजून तसाच होता, एक inning तरी सावलीत जाईल, म्हणून तो प्रश्न पुढे ढकला गेला…..आणि main म्हणजे आपल्याला फिल्डिंग ला लोकं कमी पडणार म्हणूंच बोलावले आहे, या सत्याचा साक्षात्कार त्यांना झाला होता.

सम्या ने त्याच्या खिशातुन brick game काढली (tetris या game ला बोली भाषेत brick game बोलतात!), आणि सम्याचे चालू झाले, trring, ping अशे आवाज त्या game मधून background ला चालू झाले. दोघे चिंटू पण त्या game कडेच लक्ष देऊ लागले.

बॅटिंग line up

अनुज (भावी mba) यांनी leadership रोल पत्करत बॅटिंग ऑर्डर रचायला सुरवात केली, एकदम confidently बोलला, ‘चेतन, तू आणि हेमंत opening ला जा, मी one down येतो’ ….. झालं, एवढ्यावरच त्याची लिस्ट संपली

हेमंत चालू झाला,’आपण कसे खेळायचे आहे, attack, कि टिकून टिकून, target रन रेट काय आहे आपला, over the टॉप मारायचा कि along the ground’

चेतन एवढे प्रश्न ऐकून जरा बिथरला, याच्या बरोबर बॅटिंग करायची म्हणजे, हा आपले डोके फुल्ल पकवणार, चेतन लगेच माझ्या कडे वळला, ‘तू ओपनिंग ला चल माझ्याबरोबर, हेमंत तू अनुज नंतर ये, लास्ट ला रन रेट वाढवायला तुझी गरज लागेल (आणि hopefully मी त्या वेळी आऊट झालेलो असेल) ‘

दोघे पण बॅट घेऊन निघालो, बॉल आमचा न्हवता समोरच्या टीम चा होता, तिकडे warm up चालू झाले होते..

अनुज तितक्यात बोलला, ‘अरे, आपल्या कडून umpire कोण असणार?’

सम्या ची brick game जी तो मॅच च्या वेळी खेळत बसला
सम्या ची brick game

आता अनुज ला केले असते umpire पण त्याचे लक्ष म्हणजे भटकंती, हेम्या ला घेऊन जायचेच असते तर बॅटिंग ला नेहले असते!, विराजमान मंडळी काही उठणार न्हवती, brick game वाले आता turn by turn game खेळत होते, त्यामुळे राहिला एकच, शेवटचा श्रीनाथ -अश्विन..

आम्ही तिघे pitch कडे गेलो, कसा काय माहित नाही पण मी striker end ला होतो आणि चेतन नॉन-striker ला..

trial बॉल

एक trial बॉल झाला… पुणेरी क्रिकेट चा हा एक unique feature आहे, trial बॉल. हा बॉल बॉलर कसा ही टाकतो, ९० टक्के वेळा तो विकेट किपर ला जागा करतो, त्याला तो इकडे तिकडे जाऊन पकडून आणावा लागतो, विकेटकिपरचा warm up होतो. ९ टक्के वेळा तो बॉल एखाद्या स्लिप फिल्डरचा warm up करतो, आणि १ टक्के वेळा तो batsman ला भेटतो, त्यात पण अलिखित नियम असा आहे की  batsman ला तो परत बॉलर कडे पाठवता येत असेल तरच मारावा, उगाच शॉट मारून लाल करू नये, नाहीतर सोडून द्यावा.

माझा ट्रायल बॉल स्लिप फिल्डर कडे गेला..

आता मॅच शुरु …..

ती पहिली ओव्हर

मी बॅटिंग stance घेतला, बॉलर रन उप ला जरा लांब गेला, फास्ट बॉलर आहे हे मला कळाले, ते बघून मी अर्धा फुट crease च्या आत आलो. पांढरा टी-शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरे कॅनवास चे बूट, हातात हिरवा टेनिस चा बॉल, तो धावत आला, मी पण एक्दम style मध्ये बॅट ला back lift दिली, बॅट माझ्या काना मागे उभी होईल अशी एवढी back lift दिली, बॉलर विकेट पर्यंत आला, त्याने बॉल टाकण्याच्या हिशोबाने हात फिरवला, मी पण बॅट खाली आणायला सुरवात केली,

पहिल्या बॉल ला classic फ्रंट फूट straight बॅट defense शॉट खेळण्याचा माझा प्लॅन होता,

गोलंदाजाने बॉल सोडला….. wooosshh आवाज आला….. मला बॉल दिसलाच नाही !!….. माझी बॅट कंबरे पर्यंत येण्या आधीच बॉल विकेट किपर कडे होता, मला कळले पण नाही,!!

फास्ट बॉलर चा फास्ट बॉल
तो पहिला बॉल : आला कधी गेला कधी

चेतन ने एकदम, ‘well left’, अशी शब्बासकी पण दिली…..

पण मला काही कळेना…. मी निर्धार केला, focus, focus असे स्वतःलाच बोललो, पुढचा बॉल नीट बघू असे ठरवले, back lift आता कंबरे पर्यंतच घेतली, पुन्हा तो पांढरा घोडा आला, बॉल सोडला, माझी बॅट आहे तिथेच राहिली, बॉल पुन्हा विकेट किपर कडे गेला, या वेळी मला मात्र pitch वर एका ठिकाणी धूळ उडालेली दिसली, मी फक्त अंदाज लावला, टप्पा इथे पडला असेल…..

चेतन तिकडे shadow बॅटिंग शॉट practice करत पुन्हा, ‘well left’, ओरडला

आता तिसऱ्या बॉल ला मी ठरवलं, बॅट गेली उडत, आपण back lift घ्याचीच नाही, फक्त बॉल कडे लक्ष देऊ,

या वेळी बॉल बॉलर च्या हातातून निघताना मी बघितला, तो pitch कडे येई पर्यंत मला दिसत होता, पण टप्पा घेण्या आधी तो अदृश्य झाला, या वेळी धूळ पण उडालेली दिसली नाही, माझी बॅट आहे तिथेच होती, स्लीप, विकेट किपर ने जोरात ‘oooooooohhh’ केले, बहुतेक बॉल बॅट च्या outside edge च्या किंवा स्टंप च्या outside edge च्या जवळून गेला असणार आहे, हा माझा अंदाज आहे, कारण मला काहीही कळत न्हवते..

पण चेतन ने परत ‘well left’ केले

आता छाती धड धड करायला लागली होती, अंगात एक हलकासा ताप पण वाटू लागला होता….. मी वेळ घालवण्या साठी, style मध्ये पुढे आलो, त्या ओबड धोबड pitch वर उगाचच बॅट आपटत होतो, टीव्ही वर मॅच बघून तेवढेच शिकलो होतो, चेतन पण पुढे आला, ‘जरा जास्तच swing करतोय हा’ , त्याला मी उत्तर दिले, ‘अरे मला बॉलच दिसत नाहीये, तू कसली swing घेऊन बसला आहेस?’….. चेतन ने एकदम शांत पणे उत्तर दिले, ‘घाबरू नकोस, बिनधास्त बॅटिंग कर, आपले ३० रुपये रेडी आहेत, हरलो तर देऊन टाकू, कुठे world cup ची मॅच आहे ही, बिनधास्त’

आता हे त्याने सांगायची गरज न्हवती, हरणार हे पक्के आहे, या हिशोबानेच आम्ही सगळे आलो होतो, पण तरी त्याच्या बोलण्याने मला थोडा धीर आला. पुढचा बॉल, आपण बॅट फिरवणारच हा निश्चय केला, अंदाज घेऊन बॉल जिथे आहे तिथे बॅट फिरवायची… बॉल आला, बॅट फिरली, बॅट ला बॉल लागला, पण तो edge होता, इतका नाजूक edge होता कि बॉल विकेट किपर कडेच गेला….. yess, स्लिप फिल्डर नि टाळ्या पण वाजवल्या,

मी पण झाडा खाली सावलीत दगड राहिला असेल तर तिकडे बसू, या हिशोबाने चालायला लागलो, तिकडून अनुज पण पुढे सरसावला, पण अचानक तो थांबला, समोरच्या टीम चे एक दोघे जण, cheating, cheating असे ओरडू लागले, काय चालले आहे हे बघायला मी वळालो, बघतोय काय, umpire ने नो बॉल दिला होता !

नो बॉल
नो बॉल ला आऊट

आता असे झाले कि एक दोघे पुढे cheating, cheating करत पुढे गेले तर होते, पण पुढे गेल्या वर त्यांना लक्षात आले कि umpire तर त्यांचाच चार फूट अश्विन होता,  आपल्याच माणसाशी कसे भांडायचे, यामुळे त्यांचा रोष आपोआपच मावळला, आणि ते परत आप आपल्या जागी निघू लागले

मला जीवदान मिळाल !

ते परत असताना मला लक्षात आले कि इतका वेळ आपण field placement कडे लक्षच दिले न्हवते, पण इकडे बॉल दिसण्याची पंचायत, कुठे प्लेस करणार, त्यामुळे मी परत दुर्लक्ष केले.

बॅटिंग stance घेताच होतो, तितक्यात मला आवाज आला,

‘ए बॉऊन्सर टाक रे एक जरा’

आता टेनिस बॉल वर ज्यांनी क्रिकेट खेळले आहे त्यांनाच हे कळू शकते, काय कारण आहे माहित नाही, पण टेनिस बॉल हा नेहमी नाकाला, किंवा नाक आणि डोळ्या खाली जे हाड आहे तिथेच बसतो, आणि बसला कि पुढचे ५ मिनिटे काहीही कळत नाही. डोळ्या समोर अंधार पडतो, विशेष म्हणजे फार अशी सूज आलीये असे पण नसते, पण तरी दोन दिवस ठणक राहते.

त्यामुळे बॉऊन्सर ऐकल्या वर मी लगेच तो हुकवयाचा कसा एवढाच विचार करू लागलो..

आता actual क्रिकेट मध्ये बॉऊन्सर duck करून, म्हणजे खाली बसून हुकवतात, पण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये, pitch ची बोंबाबोंब असते, बऱ्याच वेळा, शॉर्ट pitch डिलिव्हरी येते, आपण duck करतो, पण typical ground चे pitch इतके वर खाली असते कि तो बॉल बॉऊन्स होतच नाही, आपण duck करून खाली बसलेलो असतो, आणि तो न bounce झालेला बॉल येऊन बरोबर बसतो, आपल्या नाकावर, किंवा नाक आणि डोळ्या खालच्या हाडावर !

experience matters!, मी ठरवले कि duck नाही, सरळ स्टंप सोडून बाजूला व्हावं, विकेट गेली उडत हा नाकाचा प्रश्न आहे,,,,,

बॉल आला, दिसणार न्हवताच, म्हणून मी बॉलर चे हाथ फिरले कि लगेच बाजूला झालो, या गडबडीत माझी बॅट वरची ग्रीप सुटली, bottom हॅन्ड बाजूला झाला, बॅट आता एकाच हातात होती, बाजूला सरकताना बॅट एकाच हातात असल्या मुळे, ती जरा जास्तच oscillate झाली, बॉल आला, शॉर्ट pitch होता, पण बॉऊन्स झाला नाही (एक्सपेरियन्स matters), तो खालीच राहिला आणि लेग side ला वळला, आणि माझ्या oscillate होणाऱ्या बॅट ला धडकला, स्पीड इतका होता कि, लेग स्लिप च्या तिथून बॉल थेट boundary ला,, और ये लगा चौका !

एक हाती मटका शॉट
एक हाती मटका शॉट

चेतन बॅट वर एका हाताने टाळ्या वाजवत, ‘flick, एक नंबर’… चिंटू १ आणि चिंटू २ जोरात शिट्या वाजवू लागले ….. सम्या ने चक्क चक्क brick game खाली घेऊन विचारले, ‘काय झाले’,

हेमंत ने उत्तर दिले, ‘काय लेग glance मारली, एका हाताने, शॉट ऑफ the मॅच’

मॅच चा हा पहिलाच शॉट होता, तरी शॉट ऑफ the मॅच कसा!, काय सांगायचे ….

बॉलर आता चिढला, फास्ट बॉलर ला फोर गेला कि विलक्षण राग येतो, भले तो फोर त्याने wide टाकल्या वर गेला असला तरी. पुढचा बॉल हा नक्कीच जोरात असणार आणि wide असणार, रागात कधीही बॉल स्टंपात पडत नाही, ऑफ साईड ला असेल तर well left नसेल तर wide आणि एक रन

मी काही केले नाही, म्हणजे मला काही दिसले नाही, चेतन ने ‘well left’ केले आणि मला कळले, ऑफ साईड ला गेला बॉल.

पुढचा बॉल हि तसाच पार पडला. ओव्हर संपली एकदाची, मी जरा रिलॅक्स झालो, एक ओव्हर ५ रन. आता मला non striker एन्ड ला जाऊन ‘well left’ करायचे होते.

टेनिस बॉल मॅच मध्ये, बॉलर दिशा नाही बदलत, ते टीव्ही वर, इकडे बॅटस्मनच जागा बदलतात.

दुसरी ओव्हर

पुढच्या ओव्हरचे पहिले दोन बॉल….. मी ‘well left’ केले, आणि त्यात माझे contribution म्हणून, ‘आरामात, अजून पूर्ण इंनिंग आहे’ हे add केले.

चेतन ला तिसराच बॉल बॉऊन्सर आला, तो पण बाजूला झाला, पण त्याच्या वेळी बॉल बॉऊन्स झाला, इतका झाला, कि २ फुट चेतन च्या डोक्या वरून गेला, लगेच नो-बॉलचा एक रन आमच्या खात्यात पडला. पुढचा बॉल wide गेला लेग साईडला, अजून एक रन मिळाला.

मग ६ फुट सडपातळ बांधा आला, बॉलर च्या कानात काहीतरी फूस फुसला, पुढचे ३ बॉल ‘well left’ झाले. शेवटचा बॉल आत वळला, चेतन ला काही कळण्या आधीच बॉल येऊन त्याच्या गुडघ्या ला आपटला, बेकार बसला, चेतन ला काही बोलता पण येईना, मीच आपले, ‘सॉलिड defense’ करत बॅट ला टाळ्या वाजवत पुढे गेलो

‘जोरात बसला का’, मी विचारले

‘हो, चालत पण येत नाहीये’ चेतनच्या चेहऱ्या वर pain दिसत होते, ‘ तू रन नको काढू, पाळता पण येणार नाही’, त्याने instruction दिले

‘आधी बॅट ला बॉल लागू दे, मग रन चे बघू’, मी आपला एक PJ crack केला, दोघे smile करत करत आप आपल्या जागी गेलो, मी स्ट्रायकर, आणि चेतन non स्ट्रायकर एन्ड ला

झाडा खाली सम्या ची game संपली होती आणि आता चिंटू-१ चा game खेळण्याचा नंबर आला होता, त्यामुळे त्याने बळच विचारले, ‘स्कोर काय झाला’

‘७ रन, two ओव्हर्स, we are maintaining good रन रेट’, अर्थातच श्री हेमंत ने reply केला

हो रन रेट चांगला होता !, एक मटका boundary आणि ३ extra रन, पण असो..

मनाची तयारी करत मी stance घेतला, बघतोय तर काय, पांढरा शर्ट च्या ऐवजी आता पिवळा शर्ट होता….. थोडा बरं वाटलं,

बॉल आला, ऑफ साईड ला टप्पा पडला आणि विकेट किपर कडे गेला, पण या वेळी मला चक्क चक्क बॉल दिसला होता !.

पुढचा बॉल गुड लेन्थ ला आला, चक्क चक्क माझ्या बॅट ला लागला आणि थेट मिड विकेट च्या फिल्डर कडे गेला. दृष्टी परत अली होती !.

पुढचा बॉल मी सरळ बॉलर कडे मारला. बॉल दिसतोय यात मला आनंद होता, रन न्हवते पण आनंद होता

पुढचा बॉल का कुणास ठाऊक wide पडला, आणि आम्हाला एक रन मिळाला. rhythm ब्रेक झाली माझी !

पुढचा बॉल मी मस्त पैकी पिवळ्या बॉलर कडे परत मारला, पण पिवळ्या बॉल पकडण्याच्या नादात घसरला, आणि बॉल पुढे गेला, एक रन निघेल म्हणून मी धावलो, पण चेतन काही अजून धावण्याच्या परिस्तिथीत न्हवता, त्याने मला फक्त हात केला, आणि अर्ध्या pitch मधून मी परतलो…..

रन होत नाहीयेत म्हणून अचानक प्रितेश ला काय झाले माहित नाही, ‘अरे पळा कि, रन काढा’ असे तो जोर जोरात ओरडू लागला,

अचानक त्याला काय झाले कळलेच नाही, सगळे त्याच्याकडे बघत होती, विचारले तर स्कोर सांगता येणार नाही या भाऊ ला, थिर्ड man आणि gully मध्ये गोंधळ करणारा हा, अचानक काय झाले काय माहित, मला वाटतं उगाच आपल्या नातेवाईका समोर शहाणपणा दाखवायला निघाला हा बहुतेक!…… तन्मय पण त्याच्या कडे काय झाले म्हणून बघू लागला, त्याला वाटले उन्हा मुळे भुरळ पडली का काय, चिंटू-१ ला लगेच ऑर्डर दिली, ‘जा रे पाण्याची एक बाटली घेऊन ये’

पण या सगळ्या चा मोठा परिणाम पुढच्या बॉल ला झाला , मी उगाच ऑफ साईड ला square कट मारला, आणि बॉल कडे बघत बसलो आणि वळून बघतोय काय, चेतन धावत सुटलेला, almost अर्ध्यात पोचलेला,

पण बॉल तर थेट फिल्डर च्या हातात गेला होता, त्याला पाळलेला बघून मी पण सुटलो. फिल्डर ने बॉल विकेट किपर कडे फेकला, चेतन गुडघा दुखत असल्या मुळे एखाद्या कांगारू सारखा उड्या मारत मारत पळत होता, तो काही वेळेवर पोचू शकला नाही, आणि आमची पहिली विकेट गेली…..

प्रितेश च्या बोलण्याचा परिणाम
परिणाम

‘जाड्या, ढोल्या, जाड्या, ढोल्या’ असा जप करत चेतन झाडाकडे वाटचाल करू लागला,

प्रितेश ला कळाले आपली काय खैर नाही, त्याने चिंटू-१ ला थांबवले आणि म्हंटला, ‘थांब, तू एकच बाटली आणशील, मी जातो म्हणजे ४-५ बाटल्या घेऊन येतो’, आता सायकल वर कोणी का जा, बाटल्या तर तेवढ्याच येणार होत्या, पण प्रितेशने पळ काढायला चांगले कारण शोधले, आणि तो सुटला.

अनुज तो पर्यंत crease पर्यंत पोचला, माझ्या कडे वळून म्हंटला, ‘आपला रन रेट कमी आहे, आपण एक plan करू, boundary च्या नदी नको लागायला, आपण सिंगल किंवा डबल रन काढण्यावर focus करू’
त्याला म्हणणार होतो मी, आधी बॅट ला बॉल लाव, मग planning कर, पण मी स्वतःला आवरले, आणि उगाच मान डोलावली

पुढचा बॉल अनुज ने मस्त पैकी ऑफ ला प्लेस केला आणि आम्ही एक रन धावलो. ओव्हर संपली, २ रन मिळालेले,

एकूण ३ ओव्हर ९ रन.

शेवटच्या बॉल ला रन काढल्या ने अनुज strike वर परतला, आणि बघतोय काय,  पांढरा घोडा परत बॉल घेऊन, रन उप ची तयारी करत होता.

आता आमच्या अनुज ला जाड भिंगाचा चस्मा, मलाच बॉल दिसायची पंचायत, याचे काय होणार, मला चिंता वाटू लागली. पहिलाच बॉल बॉऊन्सर, अनुज ना duck करू शकला ना बाजूला होऊ शकला, बॉल बरोबर आला, आणि नाक आणि डोळ्या खालच्या हाडावर बसला, त्याचा चस्मा उडाला, अनुज एक्दम सुन्न झाला, बहुतेक डोळ्या समोर अंधार पडला असावा, तो उगाच इकडे तिकडे बघत होता,

अनुज चा चस्मा मी पुढे गेलो, चस्मा उचलून दिला, ‘ ठीक आहेस ना रे’

‘अरे बेकार जोरात फेकतोय हा, भेंडी काही दिसलच नाही’ अनुज चस्मा घालत  बोलला

‘हो जरा जपून’

‘मी एक रन काढतो, तूच खेळ याला’, तो टायसन म्हंटला आहे ना, “Everyone has a plan, till they get punched in the face”, अनुज ला आता रन रेट, एक दोन रन, काही काळात न्हवते, फक्त पळत दुसऱ्या एन्ड ला जायचं कसा, हाच विचार त्याच्या डोक्यात राहिला !

परत strike वर जायचे, हा विचार मला काही करवेना, पण रन काही लगेच निघत नाही, याची मला खात्री होती, तसा मी safe होतो!

पुढचा बॉल पण अनुज ला दिसला नाही, पण नशिबाने तो outside ऑफ होता, त्यामुळे तो “वेल-left” झाला,

त्याचा पुढचा बॉल तसाच जोरात आणि तसाच दिसला नाही, उगी उगी अनुज ने straight ड्राईव्ह सारखी बॅट फिरवली, पण बॉल ऑफ च्या खूपच बाहेर होता, infact तो wide होता, आणि आमच्या खात्यात एक रन ऍड झाला

त्या नंतर च्या बॉल ला पांढऱ्या घोडा ला instructions मिळाले, ‘अरे स्टंपात टाक कि’….. बॉल आला, अनुजने पुन्हा straight ड्राईव्ह सारखी बॅट फिरवली, बॉल स्टंपात होता आणि जरा लेग ला वळाला, पुन्हा अनुज च्या बॅट आणि बॉल मध्ये चांगले एक फूट अंतर होते, पण या वेळी बॉल अनुज च्या पायाला लागला आणि तिथेच पडला, अनुज ला कळाले हाच मौका, जीव मुठीत घेऊन तो जे धावला, तो थांबलाच नाही, पुढची विकेट, umpire, त्याच्या हि पुढे ४-५ मीटर जाऊन तो थांबला, “उगाच दुसरा रन काढायची वेळ आपल्यावर येऊ नये, याची खबरदारी म्हणून त्याने मागे वळून पण बघितले नाही!”

त्याच्या मुळे मला पण नाइलाजाने पाळावे लागले आणि एक रन आमच्या खात्यात आला.

जीव मुठीत घेऊन मी strike घेतली, पांढरा घोडा रन उप घेत असताना विचार केला कि, हि चौथी ओव्हर, आता रन पण जास्त नाहीत, तीनच ओव्हर राहिल्या आहेत, आता आऊट तर आऊट खेळू, म्हणजे आऊट झालो तर या पांढऱ्या घोड्यापासून तरी वाचू

आंधळी हि टेनिस बॉल क्रिकेट चे एक आगळे वेगळे वैशिषट्य आहे, यात आपण बॅटिंग करताना, मनात येईल त्या दिशेने जोरात बॅट फिरवायची, थोडा अंदाज घ्याचा बॉल कुठे आहे, आणि द्याची घुमवून, होईल ते होईल.

मला थोडा अंदाज आला कि बॉल ऑफ च्या बाहेर आहे, मी literally डोळे बंद केले, आणि दिली घुमवून, डोळे बंद असताना एक मस्त “कट” असा आवाज आला, मी डोळे उघडले, बॉल विकेट किपर आणि स्लिप च्या मध्ये टप्पा खाऊन थेट boundary च्या दिशेने जात होता…..

बऱ्याच वेळा नंतर झाडा खाली बसणाऱ्यांना टाळी वाजवायला मौका मिळाला,,, शिट्या, एक नंबर,  अश्या घोषणा पण झाल्या, फोर गेल्याने चेतनचा राग पण मावळला आणि तो पण जोर जोरात ओरडू लागला, हे पाहून प्रितेश ला दिलासा मिळाला, आणि तो परत येऊन आपल्या जागे वर बसला, आणि चिंटू ला सायकल ची चावी दिली – ‘पाणी घेऊन ये!’ असे सांगितले, प्रितेश एवढा वेळ झाडा मागे लपून बसला होता, पाणी आणायला तो काही गेलाच नाही!

जोर जोरात, ये ये ये, आवाजा मुळे सम्या चे concentration ब्रेक झाले, , सम्या ने brick game खाली ठेवली,’काय झाले’, विचारले

हेमंत, ‘एक नंबर शॉट, outside ऑफ slash, straight to boundary, शॉट ऑफ the मॅच’, पुन्हा वाढीव उत्तर !

पांढरा घोड्याला आता ६ फुट सडपातळ बांधा नि चांगलीच तंबी दिली, ‘अरे, स्टंपात कळत नाही का तुला’, बोलण्याला एका कॅप्टन ची authority होती, पांढरा घोडा आता बॉल स्टंपात टाकणार, मी आधीच बाजूला झालो, उगाच शरीराला इजा नको, आपल्या आंधळी काय कुठून हि मारता येईल, मी लेग side ला एक पाऊल घेतले आणि पुन्हा अधी सारखी दिली घुमवून, डोळे अर्थात बंद होते, पण पुन्हा एक “कट” आवाज आला, बघतोय काय तर बॉल माझ्या बॅट ला लागून उडाला, विकेटकिपर च्या डोक्या वरून, थेट boundary !!. चक्क चक्क मी consecutive boundary मारली होती. झाडा खालील मंडळींना आता उत्साह अवरेनासा झाला होता, जोश मध्ये जोरात शिट्ट्या, आरडा ओरड, फुल्ल enjoy. चेतन ने जोश मध्ये हेमंत लाच शाब्बासकी दिली, त्याच्या पाठीवर असला दणका बसला, हेमंत ला दोन सेकंड श्वास घेता येईना, पण तो हि जोश मध्ये होता, चेतन ला काहीही ना बोलता तो पण जोरात, ये, ये, ये, करत बसला

पुढचा बॉल ओव्हर च्या शेवट चा, चेतन ने एकदम जोरात आवाज दिला, ‘विकेट टिकाव, अजून ३ ओव्हर आहेत’

पुढचा बॉल लगेच ‘well-left’,

म्हणजे मी काय चेतन चे ऐकून सोडला असे काही नाही, २ फोर बसलेला फास्ट बॉलर पुढचा बॉल खूप जोरात टाकतो, शेवटी त्याचा ego hurt झालेला असतो,

तो बॉल इतका जोरात होता, कि माझी बॅट १ इंच पण हलली नाही, आणि बॉल विकेटकिपर कडे.

ओव्हर संपली, स्कोर आता ४ ओव्हर, १९ रन, थोडा respectable वाटू लागला होता.

पुढचा बॉलर स्पिनर होता,

आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये, स्पिनर म्हणजे जो बॉल वळवतो हि definition चुकीची आहे, pitch एवढे ओबडधोबड आहे कि बॉल हा वळणाराच. जो फास्ट बॉलर नाही, म्हणजे जो कमी रन उप घेऊन बॉल टाकतो, तो स्पिनर.

स्पिनर चे एकच main feature, तो ” नो” किंवा “wide” बॉल टाकत नाही.

अनुज आमचा स्पिनर विरुद्ध पट्टा शॉट प्लेअर होता. पट्टा शॉट हा अंधळी शॉट चा स्पेशल प्रकार आहे, यात बॅटस्मन डोळे बंद करून बॅट आडवी धरतो, ऑफ साईड ला पॉईंट करून, आणि बॉल पडला कि १८० डिग्री मध्ये तो आणि बॅट दोन्ही घुमतात, बसला तर काहीही होऊ शकता, सिक्स, फोर, catch, आणि fail गेला तर सुपडा साफ, clean bold पण !

पुढच्या बॉल ला अनुज ने घुमवली…..

ओ, सांगायचं राहिले, पट्टा शॉट मध्ये कधी कधी सिक्स, फोर, catch असे काहीच होत नाही, बॉल विकेट किपर कडे पण जातो, तेच झाले.

पण अनुज निराश झाला नाही, पुढच्या बॉल ला पण त्याने आंधळी पट्टा स्वीप shot मारला, मारला म्हणजे बॅट फिरवली, बॉल पुन्हा बॅट, अनुज, विकेट, miss करत विकेटकिपर कडे गेला….. आता एक दोन ओव्हर पूर्वी एक किंवा दोन रन पळू याची planning करणारा हा अंड्या, आता का शॉट मारत आहे, असा विचार तुम्ही करत असाल, पण ग्राउंड वर कोणीही करत न्हवते, स्पिनर चे अजून एक वैशिष्ट्य आहे, कि त्यांच्या विरोधात एक तर फोर मारावा किंवा सिक्स, नसेल जमत तर आऊट, उगाच एक दोन रन काढून timepass करणे अस्सल टेनिस बॉल क्रिकेटर च्या शाने च्या खिलाफ असते, अनुज त्याच philosophy चा पठ्या होता.

‘come on अंड्या’ झाडा खालून चालू झाले.

अंड्या ने परत पुढच्या बॉल ला खाली बसून पट्टा स्वीप फिरवला, यंदा बॉल top edge ला बसला, आणि विकेट जवळ उभ्या असलेल्या विकेटकिपर ला दिसण्या आधीच तो त्याच्या डोक्या वरून….. थेट boundary!

या वेळी सम्या नि विचारण्या आधीच हेमंत, ‘scoop शॉट, एक नंबर, boundary, शॉट ऑफ the मॅच’

टाळ्या, ये ये, आता काही कळेना, पुन्हा फुल जोश चे वातावरण झाले.

पुढच्या बॉल ला पण अंड्या ने तेच केले, या वेळी बॉल मस्त बॅट च्या मधोमध लागला, जे उडाला,,,,, ते थेट sweeper ला थांबलेल्या फिल्डर च्या हातात, त्याला एक इंच पण हलावे लागले नाही, अनुज ने नेम धरून त्याच्या कडे मारला होता असे वाटत होते, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याने नेम वगैरे काही नाही डोळे बंद करून ओढली होती…

तरी अनुज जाताना, एकदम, ‘शे, श्या’ असे आवाज काढत, बॅट एका हाताने जोरात घुमवत, मान लेफ्ट right करत, disappointment दाखवत गेला. याला काही नाही, टीव्ही चा परिणाम म्हणतात, आऊट झाल्या वर जो disappointed नाही, तो खरा बॅटस्मन नाही !

आता कोण जाणार? हेमंत होता तसा  रेडी, पण तसा तो न्हवता, त्याचे काही कळणे थोडे मुश्किलच,, दगडा वरची मंडळी आपले आसन सोडण्या च्या मूड मध्ये न्हवती, सम्या आता २३ व्या लेवल ला पोचला होता, त्याचे टार्गेट ३० ला पोचणे होते, शेवटी घुमववून फिरून, हेमंतच रेडी झाला.

हेमंत आला आणि strike घेतली, शेवटचा दोन बॉल होते.

दोन्ही  बॉल त्याने एक्दम style मध्ये left केले,,, बॅट डोक्या वर सरळ आकाशा कडे पॉईंट केली होती, आणि ती त्याने खाली आणलीच नाही, बॉल pitch वरून विकेटकीपर कडे जाई पर्यंत, मान वळवून वळवून बघितला, पण बॅट काय हलू दिली नाही. त्या स्पिनर आणि विकेट किपर ला पण ते झेपले नाही, त्यांच्या करिअर मध्ये, स्पिनर ला असे ‘well-left’ करणारा इसम त्यांने पहिल्यादाच बघितला होता.

स्कोर आटा ५ ओव्हर २३ ला पोचला होता.

हेमंत चालू झाला, ‘बघ funda असा आहे कि, क्रिकेट मध्ये पहिल्या ३० ओव्हर मध्ये जेवढे रन होतात, तेवढेच रन शेवटच्या २० ओव्हर मध्ये होतात, म्हणजे आपण या दोन ओव्हर मध्ये ३० रन चे टार्गेट ठेऊ’

मला काहीच झेपला नाही, ५ ओव्हर मध्ये २३ रन कशे आले आहेत, एकही रन विकेट च्या पुढे नाही, सगळे रन मागच्या boundary ला आले आहेत, बाकी extra, आणि २ ओव्हर मध्ये ३० रन, हे कसे काय, पण सवयी प्रमाणे, त्याचे बोलणे मी मान डोलवत ignore केले

आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुम्ही रन करा  किंवा नका करू, पण जर तुम्ही खूप वेळ टिकला तर तुमची reputation वाढते, मग तुम्ही पूर्ण वेळ non striker एन्ड ला का असेना. माझी reputation वाढली होती, त्यामुळे ६ फुट माझ्या साठी फील्ड सेट करत होता, वास्तविक रित्या मॅच ची history बघता त्याने सगळे फिल्डर विकेट किपर च्या मागे लावले पाहिजे होते….. पण तो अझहर सारखा फिल्ड सेट करत होता, उगाच एखाद्या फिल्डर ला ३-४ फुट इकडे तिकडे हलवत होता (टीव्ही चा परिणाम)

तितक्यात चेतन माझ्या साठी पाणी घेऊन आला, ‘तू नीट खेळ, आपला इन फॉर्म बॅटस्मन आहेस तू, आऊट नको होऊस, सावधानी ने खेळ ,,,,,आपल्या कडे विकेट भरपूर आहेत, तू बिनधास्त खेळ’

किस्सा रविवार दुपारच्या मॅच चा

आता याला कोण सांगणार कि दोन उलट गोष्टी, सावधानी आणि बिनधास्त , तो एकाच वाक्यात वापरतोय !

पण त्याचा उत्साह शिगेला पोचला होता, बहुदा आपण २० च्या आत ऑल आऊट होऊ अशी अपेक्षा होती, पण इकडे २३ रन झाले होते, म्हणूनच मी पाणी मागितले पण न्हवते आणि पिलो पण नाही तरी तो बाटली घेऊन आला, आणि तशीच भरलेली बाटली घेऊन परतला, जाताना मात्र, ‘त्या हेम्या चा काही ऐकू नकोस’, असे जोरात बोलला, ते हेम्या ला पण ऐकू गेले असणार, पण हेमंत त्याच्याच जगात होता.. strategy करत

पुढचा बॉलर फास्ट काम स्पिनर होता, फास्ट एवढा लांब रन उप नाही आणि स्पिनर एवढा शॉर्ट पण नाही, तो आला त्याने बॉल टाकला, त्याने बॉल टाकल्या वर मला कळले, अरे हा तर left हॅन्ड नि बॉलिंग करतोय, या आशचर्यातच पहिला बॉल ‘well-left’ झाला. पुढचा बॉल मी मारला तर मिड ऑन कडे होता, पण तो गेला मिड ऑफ कडे, पण तरी एक रन पळालो.

हेमंत आता stance घेऊ लागला, २ मिनिटे त्याने बॅट आणि मिडल स्टंप align करण्यात घालवला, मग बॅट ने crease ची line परत ओढली. (टीव्ही, टीव्ही), इकडे तिकडे फिल्डर बघितले, मग परत इकडे तिकडे बघून फिल्डर मोजले.. आणि finally  रेडी झाला.

पुढचा बॉल यॉर्कर, जो मिडल स्टंप त्याने align करताना वापरला तोच उखडून बाहेर आला. क्लीन बोल्ड !.

मग same अंड्या ची style मारत तो disappoint होऊन परतला.

disappoint होऊन परतला

आता तन्मय उठला, ‘मी जाऊन येतो’ असे म्हणत बॅट पकडली आणि सुटला

 

crease ला आला, आणि काही नाही, एका सेकंड मध्ये stance घेऊन रेडी, बॉल आला,, आणि सांगितल्या प्रमाणे तन्मय लगेच झाडाच्या दिशेने परतला….. क्लीन बोल्ड!

 

प्रितेश ला माहिती होते कि आपण गेलो आणि आऊट होऊन लगेच परतलो तर चेतन आपल्याला ला कच्चा खाईल, त्याने हुशारी ने आपल्या नातेवाईकाला पुढे केले, नवीन अनोळखी माणसाला कोण काही बोलणार नाही,

चेतन एकदम नम्र भाषेत त्याला बोलला, ‘निवांत रे, आऊट नको होऊस फक्त’

 

तो नातेवाईक आला, stance घेतला, आणि बॉल पडला रे पडला, तो स्टंप समोर आडवा उभा राहिला, बॉल येऊन पायाला लागला, टेनिस क्रिकेट मध्ये LBW आऊट नसते, हॅट्रिक ची नामुस्की त्याने avoid केली.

शेवटचा बॉल पण असाच आला आणि गेला, चेतन चे बोलने त्याने खूपच मनावर घेतले होते, चेतन त्याला बोलला नाही रन कर म्हणून त्याने रन करण्याचा प्रयत्न पण केला नाही

ओव्हर बेकार गेली, एकाच रन आणि २ विकेट, स्कोर आता २४ वर अडकला होता.

final ओव्हर

चेतन परत ना मागता पाणी घेऊन आला , ‘शेवटची ओव्हर आहे, धु जरा, पण आऊट नको होऊ, शेवट पर्यंत खेळ’, आणि तशीच भरलेली बाटली घेऊन परतला

मी परत stance घेतला, ६ फुट परत फिल्ड सेट करत बसला, ‘ए याला एक रन देऊ, बाकीच्यांना आऊट करू’ असे विकेट किपर ओरडला .

बॉल आला, शॉर्ट pitch होता, मी बॅट फिरवली, नेहमी प्रमाणे edge लागून बॉल उडाला, पण catch पकडायला कोणी न्हवते, बॉल boundary वर स्वीपर कडे गेला, आणि मी एक रन काढला.

आता झाडा  खालून, ‘एक रन काढ ,strike rotate कर’ अश्या सुचना त्या नातेवाईकाला येऊ लागल्या..

नातेवाईक पुढच्या बॉल ला पहिल्यांदा आडवा ना जाता, बॉल अंगावर ना घेता बॅट नि मारायला गेला, आणि …… क्लीन बोल्ड !

disappoint होऊन परतला

आता सगळे प्रितेश कडे बघू लागले, त्याच्या नातेवाईकाला काही बोलता येईना, तर हाच टार्गेट होणार होता, प्रितेश ला कळले आपण आता गेलो आणि आऊट झालो तर चेतन बरोबर सगळेच लावतील, त्याने एकदम विचार केला आणि म्हंटला, ‘अरे, त्या अश्विन ला बॅटिंग द्या, एवढं टीम मध्ये घेतला आहे, काय वाटेल त्याला’

हेमंत ने लगेच धाव घेतली, आणि स्वतः umpire झाला आणि अश्विन बॅटिंग ला आला.

 

अश्विन हा फास्ट बॉलर आहे कि नाही माहित नाही पण तो बॅटस्मन नक्की न्हवता, पुढचा बॉल आला त्याने बॅट फिरवली,, बॅट आणि बॉल मध्ये २ फुट चे अंतर होते…..

याला पाठवायची आयडिया कोणाची?…. प्रितेश परत झाडा मागे जाऊन लपला.

पुढचा बॉल हि तसाच गेला, बॅट च्या दोन फूट लांबून , झाडा खालून आता आवाज बंद झाले होते

हेमंत पुढे आला, आणि दोघांना म्हंटला ,’एक काम करा, बॉल बॅट ला लागू ना लागू, तुम्ही पळत सुटा, risk घ्या, आऊट तर आऊट’

बॉलर नी रन उप घेतला, त्याने बॉल टाकला आणि मी पळत सुटलो, अश्विन पण सुटला, नशिबाने बॉल बॅट ची edge घेऊन गेला, त्या मुळे विकेट किपर कडे थेट गेला नाही, थोडा बाजूला गेला, आणि त्या मुळे सुखरूप पोचलो मी.

आता last बॉल ला strike तर मिळाली, पण काय करायचे मी एक्दम blank होतो.

तितक्यात मी stance घेतला, मला एक कळाले होते की अंधळी मारायची आहे, मग विचार केला down the विकेट जाऊन try करू, निदान काही नाही तर तसाच पुढे पळत जाऊ आणि एक रन तरी मिळेल

बॉलर आला आणि त्याने नेम धरून विकेट वर बॉल टाकला, good length होता, मी पण crease सोडून दोन पावले पुढे आलो आणि घुमवली बॅट, पुढे आल्यामुळे बॉल चा टप्पा बॅट खाली पडला आणि जो काय ‘टॅक’ आवाज आला :  बॉल बॅट ला लागून जे उडाला, ते थेट बॉलर च्या मागे boundary पलीकडे, ये लागा छक्का !

लास्ट बॉल सिक्स !
लास्ट बॉल सिक्स !

झाडा खालून फुल्ल शिट्ट्या, एकमेकांना टाळ्या, फुल जोश, प्रितेश पण परत आला, आणि सगळे जोर जोरात, ये ये ये, शिट्या आणि कल्ला  चालू होता.

मी आमच्या pavilion कडे आलो, पाठी वर इतका मार बसला कि मी शेकून निघालो, शाब्बासकी च्या नावा खाली सगळ्यांनी हात मोकळे करून घेतले…

बघितलं तर मी तीन आंधळी शॉट आणि बराच वेळ non striker एन्ड ला घालवला बाकी काहीच केले न्हवते, पण त्या वेळी मला मिळालेल्या appreciation ला, “वासरात लंगडी गाय शहाणी” असा उत्तम वाक्प्रचार आहे !

ग्राउंड वर बरीच मंडळी मॅच पाहत जमली होती, म्हणजे आमची मॅच काय एवढी exciting न्हवती कि त्याला audience मिळेल, ग्राउंड वर एकच चांगले pitch होते, ते खाली कधी होईल आणि ते मॅच खेळतील याची वाट बघत होते सगळे, तितक्यात आता आमची फिल्डिंग त्यामुळे सावली साठी झाडा खाली जागा होईल, या आशेने एक दोघे तिथे आले,, त्यातल्या एकाने कुतूहलाने विचारले, ‘काय तुम्ही मॅच घेतली आहे का त्या टीम बरोबर’

‘हो’, हेमंत बोलला

‘किती रन झाले’

हेमंत नि लगेच, ‘सात ओव्हर ३२, म्हणजे साधारण साडे चार चा रन रेट आहे….’ नेहमी चे funde चालू…

‘हो का, अरे मागच्या वेळी याच टीम बरोबर मॅच झाली होती आमची, लई बेकार बॅटिंग आहे त्यांची, आम्हला ८ ओव्हर मध्ये १०० ला चोपला होता’

….. हे ऐकून, कोणीतरी फुग्याला पिन मारली कि तो कसा फुगा फुटतो, तसेच त्या इसमाने आमच्या उत्साहाचा फुगा फोडला… चेतन ने लगेच पैसे बाहेर काढले आणि आपल्या कडे ३० रुपये आहेत ना : हे कन्फर्म केले…..

आता आमची फिल्डिंग ची वेळ अली होती……

to be continued

 

Previous A Tale of Two Halves
Next Plot, Sub-Plot, Sub-Sub Plot.....

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *